गुहागर तालुक्यातील पोमेंडी परिसरातून गो वंशीय जनावरांची वाहतूक करणारे चारचाकी वाहन विहींपच्या कार्यकर्त्यांनी रोखले
गुहागर तालुक्यातील पोमेंडी परिसरातून गो वंशीय जनावरांची वाहतूक करणारे चारचाकी वाहन विहींपच्या कार्यकर्त्यांनी रोखले. त्यातील दोन जणांना पकडल्यावर वाहन चालकाने वाहनासह पोबारा केला.ते वाहन चिपळूण पोलिसांनी पकडून गुहागर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कालावधीत पोमेंडीत विहींपच्या कार्यकर्त्यांची नजर चुकवून एकजण पळत होता. त्याला रात्रीची गस्त घालणार्या गुहागर पोलिसांनी जेरबंद केले.गुहागर तालुक्यातील पोमेंडी परिसरातून एक वाहन (एमएच06, बीडब्ल्यू 9644) बुधवारी रात्री 1च्या सुमारास वेळंबच्या दिशेने चालले होते.
पोमेंडीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्रीराम विचारे यांना याची माहिती मिळाली. त्यामुळे पोमेंडी, पालशेत, वेळंब परिसरातील विहींपचे कार्यकर्ते पाळत ठेवून होते. पोमेंडीत आलेल्या वाहनाचा संशय आल्याने श्रीराम विचारे यांनी हे वाहन थांबवले. यावेळी पोमेंडीचे पोलीस पाटील सुरेश विचारे त्यांच्यासोबत होते. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे दिसून आली.वाहनातून दोनजण उतरले व त्यांनी वाहन सोडून देण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले. मात्र विचारे आणि मंडळी या गोष्टी मान्य करण्यास तयार नव्हते.
जनावरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का, असे विचारत विचारे आणि त्यांच्या साथीदारांनी त्या दोघांना अडवले. हा प्रकार पाहून वाहनचालकाने तेथून वाहनासह पोबारा केला. हे लक्षात येताच विहींपच्या कार्यकर्त्यांनी कोकण प्रांत सहमंत्री अनिऋद्ध भावे यांना याची माहिती दिली. भावे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांना दूरध्वनीवरुन गो तस्करी करणारे वाहन घेऊन चालक फरार झाल्याचे सांगितले. राजमाने यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले. चिपळूण बायपास येथे हे वाहन चिपळूण पोलिसांनी पकडले. यासोबत गाडीतील पाच जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.