काही लोकांना मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. रुग्णवाहिका तयार ठेवल्या पाहीजेत- संजय राऊत.
महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात अडचणी येत असल्याची टीका आता विरोधक करत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यापुढे जाऊन टीका केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर काही नेत्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णवाहिका तयार ठेवली पाहीजे.माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, काही लोकांना मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
रुग्णवाहिका तयार ठेवल्या पाहीजेत. एकनाथ शिंदे यांना आता कुणीही विचारत नाही. त्यांची नाराजी किंवा आनंद हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्याबरोबरचे आमदार हे कळसूत्री बाहुलीप्रमाणे असून ते गुलाम झाले आहेत. गुलामांनी बंडाची भाषा करायची नसते, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. गुलामांना आपल्या हक्कांसाठी बलिदान द्यावे लागते. मात्र ही हिंमत यांच्यात नाही.
महाविकास आघाडीचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला होता. यावरही संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा आहे. पोलीस, ईडीस, सीबीआय, आयटी अशा यंत्रणा आहेत. त्यामुळे ते अशाप्रकारचे दावे करू शकतात. अशाप्रकारच्या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर अख्खा भाजपा आम्ही १५ मिनिटांत खाली केला असता.