
दापोलीत आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
दापोली येथे औरंगाबादमधून पर्यटनासाठी आलेल्या मंगेश मुळे या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना 16 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वा. सुमारास चंद्रनगर येथे घडली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगेश प्रभाकर मुळे (58 रा. ज्योती नगर, औरंगाबाद) हे परिवारासह औरंगाबाद मधून दापोलीत पर्यटनासाठी 14 एप्रिल रोजी आले होते. ते चंद्रनगर येथील वर्षावन बंगला येथे राहण्यास होते. 15 रोजी रात्री 11.30 वाजता ते रूममध्ये झोपले होते. दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 8.15वा सुमारास ते उठले नसल्याने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे तत्काळ दापोलीतील पटवर्धन हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथून त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत खबर मकरंद गोपाळराव राजेंद्र यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली.