
रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवले जाणार.
रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी घनकचरा व सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यासाठी गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाकडून निधीही दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत गावांची निवड करून त्या ठिकाणी प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
या प्रकल्पांची कामे मार्गी लागल्यावर गावातील सांडपाण्याचे व घनकचर्याचे गाव पातळीवरच व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे.ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, शाळा आणि अंगणवाडी येथे शौचालय सुविधा, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन या घटकांची अंमलबजावणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावोगावी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवले जाणार आहेत. जिल्ह्यात 846 ग्रामपंचायती आहेत.
या सर्व गावातील गावातील प्रकल्पांच्या कामासाठी तांत्रिक मंजूरी देण्यात आली आहे. त्यातील 60 टक्के ग्रामपंचायतींमध्ये प्रकल्पांची कामे सुरू असून 40 टक्के ग्रामपंचयतींमध्ये प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे.पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावासाठी घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रतिव्यक्ती 60 रुपये तर पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावासाठी प्रतिव्यक्ती 45 रुपये निधी देण्यात येणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी 5 हजारापर्यंत लोकसंख्येच्या गावाला प्रतिव्यक्ती 280 रुपये तर त्याहून अधिक लोकसंख्येच्या गावासाठी प्रतिव्यक्ती 660 रुपये देण्यात येणार आहेत.
ज्या गावांची लोकसंख्या कमी आहे अशा गावांना सांडपाणीव्यवस्थापनासाठी किमान 50 हजार रुपये आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी किमान 50 हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी स्वच्छ भारत मिशन, पंधरावा वित्त आयोग आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजना यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.