
महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हेच जबाबदार-विनायक राऊत.
महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेला सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हेच जबाबदार आहेत. चंद्रचूड यांनी राज्यघटनेनुसार शिवसेना पक्ष आणि चिन्ह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहील, असा निर्णय दिला असता तर महाराष्ट्रावर सध्याच्या राजकीय अस्थिरतेची वेळ आली नसती, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केली.डोंबिवली पूर्वेतील पाटीदार भवन येथे रविवारी हा मेळावा झाला. यावेळी विनायक राऊत यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत न्यायदान निष्पक्ष झाले नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला नसल्यानेच ईव्हीएम मशीन घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यासाठी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जबाबदार धरले पाहिजे. ईव्हीएम घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन झाले असून चंद्रचूड यांच्या भूमिकेमुळेच हे शक्य झाले आहे. भविष्यात हीच वृत्ती कायम राहिल्यास महाराष्ट्रात बांगलादेश व श्रीलंकेसारखी अराजकता माजेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.