
सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना मिळण्याची शक्यता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला सार्वजनिक बांधकाम खाते येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना मिळणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे.मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नवीन कोणती खाती मिळणार याबाबतचे गुढ कायम आहे.
भाजपकडे असणार्या सार्वजनिक बांधकाम खात्यासह इतर दोन वेगळी खाती शिवसेनेकडे येणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे उद्योगमंत्री पद यशस्वीरीत्या भूषवलेल्या रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना हे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद मिळणार असल्याचे शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांकडून सांगितले जात आहे.