
राजापुरात गंगा स्नानासाठी भाविकांची गर्दी
राजापूर : गेली दोन वर्ष कोरोनाच्या उद्रेकामुळे गंगेचा परिसर बंदिस्त करण्यात आला होता. भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्यामुळे सदैव फुलून जाणार्या या परिसरात शुकशुकाट होता. 15 मे पासून गंगेचे आगमन झाल्यानंतर गंगा क्षेत्रावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. शनिवार, रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने गंगाक्षेत्रावर भाविकांची मांदियाळी दिसून आली. मूळ गंगा, गोमुख, काशीकुंडासह सर्व कुंडांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असून तेथे भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. राजापूर तालुक्याची ओळख आणि महती जगभरात पोहोचविणार्या गंगाक्षेत्रावर स्नानासाठी गर्दी होत असतानाच दुसरीकडे गंगाक्षेत्राची झालेली दुरवस्था चर्चेत येत आहे. या क्षेत्रावरील जीर्णावस्थेत असलेल्या इमारती यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा या क्षेत्राला मिळणे आवश्यक आहे.