महारेराचा बिल्डरांना दणका: 705.62 कोटींच्या वसुलीसाठी 1163 वॉरंट्स; 200 कोटींच्या वसुलीत यश!
मुंबई : महारेराचे ४४२ प्रकल्पांतील घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत ७०५.६२ कोटींच्या वसुलीचे ११६३ वॉरंट्स जारी केले आहेत. त्यापैकी तब्बल २०० कोटी रुपये बिल्डरांकडून वसूलही केले आहेत. यापुढे ही वसुली वाढविण्यासाठी मुंबई उपनगर आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयांत सेवानिवृत्त तहसीलदारांची नियुक्ती केली जाणार आहे.
मुंबई उपनगरात ७३ प्रकल्पांतील ३५५ तक्रारींपोटी २२८ कोटी १२ लाख आणि पुणे क्षेत्रातील ८९ प्रकल्पांतील २०१ तक्रारींपोटी १५० कोटी ७२ लाख रुपयांची वसुली बाकी आहे. ही वसुली करण्यास कसा प्रतिसाद मिळतो, त्यानुसार इतर जिल्हाधिकारी कार्यालयांतही अशा नेमणुका केल्या जातील. घर खरेदीदारांच्या तक्रारींवर सुनावणी होऊन भरपाई वेळेत देण्याचे आदेश बिल्डरांना दिले जातात. बिल्डरांनी रक्कम दिली नाही, तर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून, महारेराकडून असे वॉरंट्स जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात.
महारेराने घरखरेदीदारांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. आतापर्यंत नुकसान भरपाईसाठी ४४२ प्रकल्पांतील ७०५.६२ कोटींच्या वसुलीसाठी ११६३ वॉरंट्स जारी केले आहेत. यापैकी १३९ प्रकल्पांतील २८३ वॉरंट्सपोटी २०० कोटी २३ लाख वसूल झाले. महसूल खात्यातील सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत अशा प्रकरणांचा जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे वसुलीला गती आली आहे.