ठेकेदाराने ठेका सोडल्याने चिपळूण आगारात अस्वच्छतेचे साम्राज्य.
चिपळूण येथील आगाराच्या गाड्या स्वच्छता विभागात ठेकेदारी कामगार नसल्याने कचर्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामंडळाकडून ३२ लाख रुपये थकल्याने ठेकेदाराने ठेका सोडल्याचा परिणाम विभागातील स्वच्छतेवर झाला आहे. त्यामुळे मजुरीवर कामगार आणून गाड्या धुण्याचे काम केले जात आहे. या सार्या परिस्थितीमुळे साठलेला कचरा ४ दिवसांपूर्वी शहरातील भोगाळे येथील उघड्या जागेत टाकला जात होता. यावरून मोठी चर्चा रंगली होती.येथील आगार परिसर व बसेस स्वच्छतेसाठी महामंडळाने ठेकेदार नेमले आहेत.
त्यानुसार आतापर्यंत आगार परिसर व बसेसमधून निघणारा कचरा एका बाजूला साठवून त्यानंतर नगर परिषदेला पत्र देवून त्यांच्या घंटागाड्यांमधून कचरा प्रकल्पात नेला जात होता. आजही आगार परिसरातील कचरा घंटागाड्यांमधूनच नेला जातो. असे असताना बसेस स्वच्छता विभागात कार्यरत असणार्या ठेकेदाराचे ३२ लाख रुपये महामंडळाकडे थकले आहेत. त्यामुळे कर्मचार्यांना पगार कोठून द्यायचा, असा प्रश्न ठेकेदारासमोर उभा ठाकल्याने ५ महिन्यांपासून ठेकदाराने ठेका सोडला आहे. त्यामुळे काही दिवस बसेसची तितकीशी स्वच्छता होत नव्हती.
मात्र आता मजुरीवर कामगार आणून बसेसची स्वच्छता व धुण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे हे कामगार बसेसमध्ये मिळणारा कचरा आगाराच्या कोपर्यात साठवून ठेवत आहेत. मात्र गेल्या ५ महिन्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात साठल्याने व नजिकच्या काळात आगारात उत्सव असल्याने ४ दिवसांपूर्वी हा कचरा टँकरमध्ये भरून आगाराच्या भोगाळे येथील मोकळ्या जागेत टाकला जात होता.
यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी आक्षेप घेतल्याने मोठी चर्चा रंगली होती. त्यानंतर हा कचरा उचलून नगर परिषदेच्या कचरा प्रकल्पात टागण्यात आला. www.konkantoday.com