
ऑनलाईन कर्जासाठी जादा पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाची बदनामी
लांजा : मोबाईलसाठी घेतलेल्या ऑनलाईन कर्जासाठी जादा पैसे भरण्यास नकार दिला. या कारणातून तरुणाचा फोटो एडिट करून बदनामीकारक मजकूर टाईप करत बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 11 जुलै रोजी सकाळी 9.32 वा. पाली येथे घडली आहे. याबाबत सम्राट सहदेव गवळी (वय 22, मुळ रा. लांजा, सध्या रा. पाली, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याने प्लेस्टोअरवरून कॅश वर्ल्ड ऑनलाईन लोन अॅप डाउनलोड केले होते. त्यावरुन 2 हजार 277 रुपये लोन घेऊन त्या लोनचे 7 दिवसांनंतर 3 हजार 796 रुपये भरावे लागणार होते. त्याप्रमाणे सम्राट गवळीने लोन घेऊन 7 दिवसानंतर पैसे भरलेही होते. परंतु पैसे भरुनही त्याच्याकडे जास्तीच्या पैशांची मागणी करण्यात आली होती. तेव्हा त्याने पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर मजकूर टाईप करुन त्याची बदनामी केली. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.