मासेमारी नौकेची पाणबुडीला धडक, दोन खलाशांचा मृत्यू!

मुंबई : पाणबुडीला मासेमारी नौकेने धडक दिल्याची घटना अरबी समुद्रात घडली असून या धडकेत नौकेवरील दोन खलाशांचा मृत्यू झाला. या अपघातात नौसेनाच्या पाणबुडीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मासेमारी नौकेवरील तांडेलविरोधात मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नौकेवरील दोन्ही खलाशांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते जे जे रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटविण्यात येत आहे.

कर्नाटक येथील कारवार बंदरातून भारतीय नौसेनेची आय.एन.एस. करंजा ही पाणबुडी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास पैरीस्कोप डेप्थ मेंटेन करून गोवा राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरून दक्षिण पूर्व (१५४ डिग्री) दिशेने ६ सागरी मैल वेगाने जात होती. दरम्यान, पाणबुडीच्या उजव्या बाजूस एक मासेमारी बोट दोन ते तीन किमी अंतरावर होती.भारतीय नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत सिंह यांनी केलेल्या तक्रारीनुसार, पाणबुडीवरील यंत्रणेवर एफ. व्ही मारयोमा मासेमारी नौका दिसत होती. त्यावेळी एफ. व्ही. मारथोमा मासेमारी नौकेने अचानक वेग वाढवला आणि ती आमच्या पाणबुडीजवळ येऊ लागली. त्यावेळी ऑफीसर ऑफ द वॉच यांनी नौकेपासून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी पाणबुडीचा वेग वाढवून दिशा बदलली. परंतु एफ. व्ही. मारथोमा नौका वेगात येऊन पाणबुडीवर धडकली. पाणबुडीवरील अधिकाऱ्यांनी बुडालेल्या बोटीवरील खलाशांच्या बचावासाठी बचाव मोहीम हाती घेतली. त्यानंतर काही वेळाने भारतीय नौदलाचे एक जहाज बचाव कार्यासाठी धावून आले. बुडालेल्या एफ. व्ही. मारथोमा बोटीवरील हरवलेल्या दोन खलाशांचे मृतदेह शोध मोहिमेदरम्यान सापडले असून हे मृतदेह यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. नौसेनेच्या पाणबुडीचे सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे नौसेनेचे कार्यकारी अधिकारी कमल प्रीत सिंह यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button