मानसिक ताणाकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका : श्वेता चव्हाण
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजनरत्नागिरी : किशोरावस्थेत शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचाही विचार केला पाहिजे मात्र आपल्याकडून नेहमीच मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. वेडेपणा म्हणजेच मानसिक आजार नव्हे तर अतिरिक्त ताणाचा आपल्या मनावर परिणाम होतो. मानसिक ताण हा वेगवेगळ्या प्रकारचा असून तो सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. काहीजण केवळ सहन करत राहतात; पण बोलत नाही म्हणूनच या ताणाचा मनाबरोबरच शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे बोला, व्यक्त व्हा आणि योग्य तो सल्ला घ्या, असे सल्ला रत्नागिरी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमातील सामाजिक कार्यकर्त्या श्वेता चव्हाण यांनी विद्यार्थिनींना दिला.
येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी “मासिक पाळी व्यवस्थापन आणि किशोरावस्था/तारुण्यावस्थेतील आरोग्य, घ्यावयाची काळजी” याविषयावर कार्यक्रमाचे आयोजन आज (३ डिसेंबर) करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समुपदेशक प्राची जाधव-भोसले, स्टाफ नर्स समीक्षा दैत्य, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. सुलोचना कुमारी उपस्थित होत्या. यावेळी श्रीमती चव्हाण यांनी मानसिक तणावासाठी ऍक्टिव्हिटी घेतली.प्रारंभी स्टाफ नर्स समीक्षा दैत्य यांनी मुलींची किशोरावस्थेकडून प्रौढावस्थेकडची वाटचाल सांगताना मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळीचे चक्र, नियमित आणि अनियमित मासिक पाळीची लक्षणे, मासिक पाळीमध्ये शारीरिक, मानसिक बदल/लक्षणे, या दरम्याने घ्यायची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.
प्राची जाधव-भोसले यांनी ‘वयात येताना हितगुज उमलत्या कळ्यांशी’ यावर संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी असुरक्षित स्पर्शाची माहिती देणारी व्हिडीओ क्लिप दाखवली. तारुण्यवस्थेत पदार्पण करताना शरीरात, मनात अनेक बदल होत असतात. ते समजून घेण्यासाठी आई, ताई, शिक्षिका किंवा गरज पडल्यास समुपदेशन यांच्याशी बोला, डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. आज रत्नागिरीसारख्या जिल्ह्यातही कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगून प्राची भोसले यांनी आज तारुण्यवस्थेत पदार्पण करताना वयाच्या त्या नाजूक टप्प्यावर मुलांविषयी आकर्षण निर्माण होते, ते चुकीचे नाही; मात्र कोणत्याही परिस्थिती चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका, आपल्यावर अत्याचार होतोय असे वाटल्यास लागलीच त्यावर आवाज उठवा. आपल्या करिअरला प्राधान्य द्या, असे आवाहन केले.
यानंतर प्राचार्या डॉ. जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय किशोखयीन स्वास्थ कार्यक्रमाचे समुपदेशक प्रवीण भोयर, (आदित्य बिर्ला फाउंडेशन) मानसिक आरोग्य समुपदेशक ऋत्विक मयेकर यांनीही विद्यार्थ्यांसाठी वेगळी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. प्रा. निकिता नलावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. हुमेरा काद्री यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. तन्वी सुर्वे यांनी आभार मानले.