राणी लक्ष्मीबाईनी स्वातंत्र्यासाठी आपल्या कर्तुत्वाने इतिहासाच्या पानांवर ठसा उमटवला-सौ. प्रतिभा प्रभुदेसाई
रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाईनी स्वातंत्र्यासाठी आपल्या कर्तुत्वाने इतिहासाच्या पानांवर ठसा उमटवला. सामान्य घरांत जन्मलेली पण झाशीची राणी झालेली कर्तबगार राणी लक्ष्मीबाईंचा आदर्श आजच्या मुलींनीही घेतला पाहिजे, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षिका आणि रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या कार्यकारिणी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे नाचणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ येथे आयोजित राणी लक्ष्मीबाई जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापिका अनुप्रिता आठल्ये, संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, कार्यकारिणी सदस्य मानस देसाई, प्रमोद कोनकर, डाएटच्या अधिव्याख्यात्या सौ. दीपा सावंत, शिक्षिका सौ. शरदिनी मुळ्ये, सौ. विनोदिनी कडवईकर, दीपक नागवेकर आदी उपस्थित होते.
सौ. प्रभुदेसाई यांनी राणीचा थोडक्यात इतिहास अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. प्रमोद कोनकर यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही कुठे कार्यक्रमाला गेलात किंवा शाळेत कार्यक्रम असला तरी त्यातील आवडलेल्या गोष्टी लिहून ठेवायची सवय अंगी बाणवा, तुमच्या मनातील प्रश्न शिक्षकांना विचारा, कुतुहल जागवा, असे आवाहन केले. सौ. सावंत यांनीही मार्गदर्शन करताना झाशीच्या राणीचा आदर्श मुलींनी व मुलांनीही घेतला पाहिजे.
आई, बहिण, मैत्रिणीचा आदर करण्याची सवय मुलांनी करून घेतली पाहिजे असे सांगितले.दीपप्रज्वलन व राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू झाला. या वेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने शाळेला अडीच हजार रुपयांची उपयुक्त पुस्तके, राणीच्या फोटोची फ्रेम भेट म्हणून दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र पुस्तक व खाऊ भेट म्हणून देण्यात आला.
अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी दोन हजार रुपयांची देणगी दिली. सचिव शिल्पा पळसुलेदेसाई यांनी संस्थेतर्फे सूत्रसंचालन केले. माधव हिर्लेकर यांनी आभार मानले.
*स्पर्धेतील विजेते विद्यार्थी*
वक्तृत्व स्पर्धा मोठा गट- तन्वी धुळप, मयुर चौधरी, तनया घवाळी. लहान गट- आरुषी काजरोळकर, हेतल चौहान, तन्वी गावडे. चित्रकला मोठा गट- आर्यन घाणेकर, तन्वी धुळप, सारा भोसले, लहान गट- हेतल चौहान, आरुषी काजरोळकर, अनन्या पांचाळ.
डिक्शनरी स्कील मोठा गट- अन्सार नासिर, पूर्वी साळुंखे, तनया घवाळी. लहान गट- मोहित काजरोळकर, भैरवी चव्हाण, समिना अन्सारी.
१०० मीटर धावणे मोठा गट- आर्यन घाणेकर, आयुष आग्रे, दिव्या साळुंखे. लहान गट- आर्यन घेवडे, आरुष भोगले, युविका चौहान.
प्रश्नमंजुषा मोठा गट- सोहन लिंगायत, वेदांत टाकळे, पूर्वी साळुंखे. निबंध स्पर्धा लहान गट- आरुषी काजरोळकर, स्वरा सुपल, इशिका भोगले.
या विजेत्यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.