मनसेचे ठाणे, पालघरचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश जाधव यांचा आपल्या पदाचा राजीनामा.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवड्याभराचा कालावधी होऊन गेला आहे. पण अद्यापही राज्यात सत्तास्थापन झालेली नाही किंवा सर्वात जास्त आमदार निवडून आलेल्या भाजपाने आपल्या मित्रपक्षांसोबतच सत्तास्तथापनेचा दावा देखील केलेला नाही.त्यामुळे या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. पण महाविकास आघाडीतील काही उमेदवार असे आहेत, ज्यांनी फेरमतमोजणीची मागणी करणारे अर्ज निवडणूक आयोगाला पाठवले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत मनसेला भोपळा मिळाला असून या पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेत राहून एकही आमदार निवडून न आलेल्या पक्षांमध्ये मनसे गणला जात आहे, असे असतानाच आता मनसेचे ठाणे, पालघरचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेविधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्काळ सर्व पराभूत उमेदवारांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांची विचारपूस केली. त्यांच्या मतदारसंघात काय झाले? कमी मते का मिळाली? काय करण्याची गरज आहे असे वाटते? स्थानिक पदाधिकारी काम करत होते का? तुमच्यासमोर काही अडचणी आहेत का? असे विविध प्रश्न विचारत त्यांनी उमेदवारांना बोलते केले होते. यावेळी उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला दिलेला पाठिंबा हा चुकीचा निर्णय होता, असे थेटपणे म्हटले. पण हार न मानता पुन्हा नव्या उमेदेने उभे राहू, असा विश्वास मनसे उमेदवारांनी राज ठाकरेंना दिला. पण निकालाच्या आठवड्याभरातच मनसेला मोठा धक्का मिळाला आहे. कारण मनसेचे ठाणे, पालघरचे जिल्हाध्यक्ष असलेले अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.