त्यानी शिट्टी वाजवतात सर्व मगरी नदीच्या काठावर येतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात इन्सुली तेरेखोल नदीपात्राच्या बाजूला साईश नाईक यांचं घर आहे. घराशेजारीच नाईक यांची नारळ, सुपारीची सुंदर अशी बाग आहे. बागेला लागून असलेल्या तेरोखोल नदीपात्रात 2003 पासून मगरी राहतात. विशेष म्हणजे या मगरी अजिबात कोणालाही काहीच त्रास देत नाहीत. उलट…मगरी पाण्यात कुठेही असल्या तरी नाईक यांच्या एका शिट्टीवर धावत काठावर येतात. 20-22 वर्षांपासून याठिकाणी मगरी आहेत. आता तर त्यांना पाहायला दूरदूरहून पर्यटक येतात. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह परदेशी पाहुणे इन्सुली गावात दाखल होतात. मगरींना पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढतेय.साईश नाईक यांनी सांगितलं की, ‘साल 2003पासून मगरी या नदीपात्रात आहेत. पूर्वी संख्या कमी होती.
आता मात्र जवळपास 50-60 मगरींचं दर्शन याठिकाणी होतं. घराजवळच्या बागेत सारखं येणं-जाणं असल्यामुळे मगरी दिसतात. तसंच मगरींनाही कुटुंबातील सदस्यांची सवय झाली आहे. आता त्या हा परिसर सोडून कुठेही जात नाहीत, 2003 पासून इथं राहतात पण त्यांचा कोणताही त्रास होत नाही. काहीवेळा मगरी पात्राच्या वर बागेतदेखील येतात.’ एकूणच नाईकांची कित्येक वर्षांपासून मगरींशी घट्ट मैत्री आहे. माणसं आणि मगरींना एकमेकांची जणू सवय झालीये.