जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्यावतीने जनजागृती रॅली. एडस् निर्मूलनासाठी काम करणाऱ्या शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम प्रशंसनीय- डॉ. जयप्रकाश रामानंद
रत्नागिरी, दि. 2 : एडस् निर्मूलनाबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी प्रशंसनीय काम करत आहेत, असे गौरवोद्गार शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी काढले.
जिल्हा एडस् प्रतिबंध विभाग, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने 1 डिसेंबर जागतिक एडस् दिनानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती करणाऱ्या मोटर सायकल रॅलीला डॉ. रामानंद यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.
डॉ. जगताप म्हणाले, निरोगी आरोग्य जगण्यासाठी समाजातील प्रत्येकापर्यंत एडस् बाबतची माहिती मिळावी, यासाठी रॅली काढण्यात येत आहे. तालुक्याच्या ठिकाणीही मोफत औषध उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त जनजागृती करुन एडस् चे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.
यावेळी उपस्थितांनी शपथही घेतली. एडस् निर्मूलनात काम करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. ही मोटार सायकल रॅली जिल्हा रुग्णालयापासून प्रमुख रस्यांवरुन काढण्यात आली. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.000