अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचतो की नाही, याची होणार पडताळणी- अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम

रत्नागिरी, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या वर्गाच्या कल्याणाकरिता अनेक योजना आहेत आणि त्यासाठीची विशेष तरतूद देखील उपलब्ध आहे. असे असताना देखील असे निदर्शनात येते की, हा निधी एकतर खर्च केला जात नाही किंवा योग्य लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहचत नाही. याबाबत अर्जदारांची पडताळणी करण्यापासून, त्या कामाची पातळी जोखण्याची जबाबदारी आयोगाकडून केली जाईल, असे सक्त निर्देश अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

येथील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, प्र. जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा गटविकास अधिकारी जे.पी. जाधव, जात पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसूलेदेसाई, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. ॲड श्री. मेश्राम यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती वर्गाच्या कल्याणाकरिता विविध विभागांच्या असणाऱ्या योजना, त्याबाबतची सद्यस्थिती याचा अहवाल प्रत्येकाने द्यावा. समाजातील वंचित घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना अत्यंत महत्वाच्या आहेत. शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी या योजनांचा लाभ समाजातील योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावे. दिलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी देखील करावी.

प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना नोकरी मिळाली आहे का अथवा त्यांनी व्यवसाय सुरु केला आहे का याबाबतची माहिती विभागाने वेळोवेळी घ्यायला हवी. कोणतेही प्रलंबित प्रकरणे वा प्राप्त तक्रारी या तात्काळ निकाली काढाव्यात, असेही ते म्हणाले. ॲड श्री. मेश्राम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने विकासपर्व हे कॉफीटेबल बुक आणि लोकराज्याचा अंक देऊन उपाध्यक्ष ॲड श्री. मेश्राम यांचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी स्वागत केले. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे जिंगल्स ऐकून आणि कॉफीटेबल बुकमधील समावेश पाहून ॲड श्री. मेश्राम यांनी समाधान व्यक्त केले. सहाय्यक आयुक्त श्री. घाटे आणि गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button