राजापुरात सव्वालाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

राजापूर : तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत वाटूळ, पाचल आणि नाणार, इंगळवाडी अशा तीन ठिकाणी प्रत्येकी एकेक नव्याने मतदार केंद्र वाढविण्यात आली असून, त्यामुळे तालुक्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या १९५ झाली आहे. १ जुलै २०२५ च्या मतदार यादीनुसार राजापूर तालुक्यात १ लाख २० हजार ७०४ मतदार आहेत. यामध्ये ६३ हजार ७५६ महिला, तर ५६ हजार ९४८ पुरुष मतदार असणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला जिल्हा परिषदेसाठी सहा लाख, तर पंचायत समितीसाठी साडेचार लाख रुपये खर्चाची मर्यादा रहाणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत बारा पंचायत समितीचे गण यांचा समावेश असून काही दिवसांपूर्वी या गट आणि गण यांच्या आरक्षणाची निश्चिती झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजापूरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी याबाबत माहिती दिली.
त्या म्हणाल्या, “राजापूर तालुक्यात यापूर्वी १९२ मतदान केंद्रे होती. त्यामध्ये आणखी तीन नवीन मतदान केंद्रे वाढविण्यात आली असून वाटुळ, पाचल आणि नाणार, इंगळवाडी अशा तीन ठिकाणी प्रत्येकी एकेक केंद्र नव्याने असणार आहेत. त्यामुळे आता तालुक्यात १९५ केंद्रे असतील.तालुक्यातील अणुस्कुरा,पन्हळे तर्फे सौंदळ आणि धारतळे येथे स्थिर सर्व्हे पथक स्थापन करण्यात येणार आहेत. फिरती पथके देखील असणार आहेत.
डॉ. जैसमिन पुढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, अर्ज पडताळणी, अर्ज मागे घेणे, मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी याबाबत माहिती दिली. १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू होत असून ती प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. रविवारी सुट्टी असल्याने त्यादिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराला सहा लाख, तर पंचायत समितीसाठी उमेदवाराला साडेचार लाख खर्चाची मर्यादा ठरविण्यात आली असून राजापूर तालुक्यातील आबासाहेब मराठे महाविद्यालयात मतदान साहित्य वाटप निवडणूक यंत्रणेला केले जाणार आहे. मतदान यंत्रे तेथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणार असून ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून आबासाहेब मराठे महाविद्यालयातच मतमोजणीला सुरवात होईल, अशी माहिती डॉ. जैसमिन यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button