कोकण रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करणे गरजेचे.
कोकण रेल्वेच्या सर्व पायाभूत सुविधा २५ वर्षे जुन्या आहेत. या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, हे काम करायला मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्चाची गरज आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.लोकसभेत दिलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले की, कोकण रेल्वेच्या पायाभूत सुविधांना आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी जुन्या पायाभूत सुविधांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रचंड मोठ्या भांडवली खर्चाची गरज आहे. कोकण रेल्वेचे पाच भागधारक आहेत.
त्यात रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, गोवा सरकार आणि केरळ सरकार यांचा समावेश आहे. या भांडवली खर्चासाठी संबंधित भागधारक राज्य सरकारकडून मदत मागितली आहे, असे ते म्हणाले.रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, बोगद्यांचे नूतनीकरण यासह विविध पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करणे आवश्यक बनले आहे. यासाठी मोठ्या भांडवली खर्चाची आवश्यकता आहे. या भांडवली खर्चाच्या पूर्ततेसाठी सर्व भागधारक राज्य सरकारांना त्यांच्या हिश्श्यानुसार योगदान देण्यास किंवा रेल्वेमंत्रालयाच्या फायद्यासाठी आपला हिस्सा सोडून देण्याची विनंती केली आहे. केवळ गोवा सरकारने त्यांचा हिस्सा सोडून देण्याची तयारी दर्शविली आहे, असे वैष्णव म्हणाले.