कोकण मीडिया लेख आणि चित्रकला स्पर्धेचे रविवारी बक्षीस वितरण.
रत्नागिरी : रत्नागिरीतील कोकण मीडियातर्फे दिवाळी अंकासाठी कोकणातील ग्रामदैवते या विषयावरील लेख आणि चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण लांजा येथे येत्या रविवारी (दि. १ डिसेंबर) होणार आहे.`कोकणातील ग्रामदैवते’ ही यावर्षीच्या कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाची लेख आणि चित्रकला स्पर्धेची संकल्पना होती. त्यातील लेख स्पर्धेत अनुक्रमे बाबू घाडीगावकर (दापोली), विराज चव्हाण (वाटूळ, राजापूर), सौ. स्वानंदी स्वरूप जोगळेकर (साखरपा, संगमेश्वर), प्रकाश गोसावी ( विरार) यांनी, तर चित्रकला स्पर्धेत विष्णु गोविंद परीट (सोनवडे, संगमेश्वर), सुयोग चंद्रकांत रहाटे (नांदळज, संगमेश्वर) आणि साहिल सुरेश मोवळे (किरडुवे, संगमेश्वर) यांनी यश मिळविले आहे. त्यांना रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लांजा शाखेचे अध्यक्ष अॅड. विलास कुवळेकर आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण समारंभ लांज्यातील लोकमान्य ग्रंथालयाच्या सभागृहात रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होईल. कोकण मीडिया आणि लोकमान्य ग्रंथालयातर्फे आयोजित केलेल्या या समारंभाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण मीडिया आणि लोकमान्य ग्रंथालयाचे अध्यक्ष अॅड. अभिजित जेधे यांनी केले आहे.