सावर्डे येथे नुतन आमदार शेखर निकमांच्या शुभेच्छा बॅनर काढल्याने काही काळ तणाव.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आमदार शेखर निकम यांच्या शुभेच्छांचा लावलेला बॅनर एका व्यावसायिकाने काढल्यानंतर सावर्डेमध्ये तणाव निर्माण झाला. मात्र आमदार निकम यांनी घेतलेली संयमी भूमिका आणि व्यावसायिकाने मागितलेल्या माफीनंतर तणाव निवळला.विजयी उमेदवार निकम यांना शुभेच्छा देणारे बॅनर सर्वत्र महायुतीचे कार्यकर्ते, समर्थकांतून लावले गेले आहेत. अशातच मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथे एका खांबाला लावलेला बॅनर तेथील एका व्यावसायिकाने सोमवारी रात्री काढून ठेवला. मंगळवारी हा प्रकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर शंभरहून अधिक कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले.
कार्यकर्त्यांची जमवाजमव लक्षात आल्यानंतर सावर्डे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्ते व्यावसायिकाला जाब विचारत होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर सदर व्यावसायिकाने माफी मागत सदरचा बॅनर जेथून काढला तेथे पुन्हा लावला. www.konkantoday.com