तासगाव अर्बन बँक लुटण्याचा सांगलीत प्रयत्न!
सांगली : अज्ञात चोरट्यांनी बाजार समितीमधील तासगाव अर्बन बँक लुटण्याचा मध्यरात्री प्रयत्न केला. बँकेत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून पोलीस या चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. याबाबत माहिती अशी, तासगाव अर्बन बँकेची सांगली बाजार समितीमध्ये शाखा कार्यरत आहे. या शाखेत असणारी स्ट्राँगरूम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान पोलीस आल्याने त्यांनी पोबारा केला.
चोरट्यांनी बँकेचे शटर तोडून आत प्रवेश केला. यावेळी सतर्क यंत्रणेचा भोंगा वाजू नये यासाठी असलेल्या अलार्मचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर कटावणीने स्ट्राँगरूम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.दरम्यान, अलार्मचा वीजपुरवठा खंडित होताच याचा संदेश बँकेच्या व्यवस्थापकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या धटनेची माहिती दिली. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, पोलिसांची चाहूल लागण्यापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली. मात्र, माग मिळाला नाही. मात्र, चोरट्यांचा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या आधारे पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहेत.