जन सुरक्षा योजना शिबीर विमा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. २८ :- जन सुरक्षा योजना शिबिर २६ नोव्हेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार वित्त मंत्रालय यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा या दोन्ही विमा योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे. विमाकवच घेऊन अत्यंत कमी हप्त्यामध्ये असल्याने स्वतः व आपल्या कुटुंबियांना सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक जीवन विमा योजना असून भारत सरकारने सुरू केली आहे. यामध्ये फक्त ४३६ रुपये वार्षिक प्रीमियममध्ये जीवन विमा संरक्षण मिळते. विमाधारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. 18 ते 50 वर्षे वयोगटातील बँक खाते असणारा कोणताही भारतीय नागरिक, या योजनेचा लाभ घेऊ शकतो. विमा कालावधी एक वर्षाचा असून दरवर्षी नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कमी खर्चात जीवन विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली असून कुटुंबातील व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य मिळू शकते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) भारत सरकारने सुरू केलेली एक अपघात विमा योजना आहे.
या योजनेद्वारे प्रति वर्ष फक्त २० रुपये वार्षिक प्रीमियम भरुन नागरिकांना अपघाती संरक्षण दिले जाते. अपघातामध्ये मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक मदत दिली जाते. अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, पूर्ण अपंगत्व (दोन्ही डोळे, हात, किंवा पाय गमावणे) २ लाख रुपये, आंशिक अपंगत्व (एक डोळा किंवा एक हात/पाय गमावणे): १ लाख रुपये. १८ ते ७० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना विशेषतः कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असून त्यांना अपघाती जोखमीपासून आर्थिक संरक्षण मिळू शकते. या दोन्ही योजना बँक खात्याशी जोडलेल्या असून प्रीमियम दरवर्षी ऑटो-डिबिटद्वारे थेट बँक खात्यातून वसूल केला जातो. तसेच या योजना सर्व बँका, पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहेत. सर्व नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक- बँक ऑफ इंडिया द्वारे करण्यात आले आहे.