
दापोली शहरातील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण सहकारीपतसंस्थेत रक्कम न भरता पसार झालेल्या संशयितास अटक.
दापोली शहरातील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात जमा केलेली पिग्मीची रक्कम भरण्यासाठी आलेल्या पिग्मी एजन्टची नजर चुकवून ती रक्कम पळविलेल्या मुख्य संशयिताला दापोली पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतले आहे. प्रियंकासिंह कलाकार पवार (वय ३२) असे संशयिताचे नाव आहे.२१ नोव्हेंबर २०२४ ला सकाळी १० वाजता गोपाळकृष्ण पतसंस्थेचे पिग्मी एजंट संदेश गांधी त्यांनी जमा केलेली ४९ हजार ५० इतकी रक्कम पतसंस्थेत भरणा करण्यासाठी आले होते. टेबलवर पैसे ठेवून चलन भरत असताना अनोळखीने ती रक्कम गांधी यांची नजर चुकवून पळविली. हा सर्व प्रकार पतसंस्थेमधील सीसीटीव्हीमध्ये चित्रितही झाला होता. या प्रकरणी गांधी यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार गुन्हाही दाखल होता.
पतसंस्थेमधील सीसीटीव्ही फूटेज व पतसंस्थेच्या बाहेरील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करून दापोली पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता या मुलांनी चोरलेले पैसे त्यांच्या नातेवाइकांकडे दिल्याची कबुली दिली होती; मात्र हे पैसे घेऊन या मुलांच्या नातेवाइकाने दापोलीतून पोबारा केला होता. तांत्रिक तपास करून दापोली पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढला व बजरंगपुरा माचल, इंदोर, मध्यप्रदेश येथून या प्रकरणातील संशयित प्रियंकासिंह कलाकार पवार (वय ३२) याला दापोली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्याला दापोली येथे आणले आहे. दापोली येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.