परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 1 डिसेंबर रोजी प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी, दि. 27 : परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 1 डिसेंबर रोजी परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 वाजलेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी लागू केले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 ही परीक्षा रत्नागिरीतील 1. गोगटे जोगळेकर महाविद्यालय (लॉ कॉलेज), 2. फाटक हायस्कूल या दोन उपकेंद्रावर रविवार दि. 1 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 10.00 ते 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत दोन सत्रात घेण्यात येणार असून एकूण 867 उमेदवारांना या परीक्षेस प्रवेश देण्यात आला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये अपर जिल्हादंडाधिकारी जिल्हयातील वर नमूद केलेल्या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी 08.00 वाजलेपासून सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.000