दिल्ली येथील पोलीस क्रीडा स्पर्धेत रत्नागिरीतील शीतल संभाजी पिंजरे यांनी उंच उडी प्रकारात कांस्य पदक पटकावले.
73व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी पोलीस दलातील महिला पोलीस कॉंस्टेबल/१३५८ श्रीमती शीतल संभाजी पिंजरे यांनी उंच उडी प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले.दि. ९ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ७३ वी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा नवी दिल्ली येथे झाली. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण ४० विविध पोलीस दलांतील संघ सहभागी झाले होते. यात महाराष्ट्र पोलीस दलाचादेखील सहभाग होता.या स्पर्धेत “उंच उडी“ या स्पर्धा प्रकारात रत्नागिरी पोलीस दलाच्या महिला पोलीस कॉंस्टेबल श्रीमती शीतल पिंजरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यांनी १.६३ मीटर उंच उडी मारून आपले नाव कांस्यपदकावर कोरून महाराष्ट्र पोलीस दलाची तसेच रत्नागिरी पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
७३व्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत पोलीस कॉंस्टेबल श्रीमती पिंजरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. तसेच दहा हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे