सांगोल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख महाविकास आघाडीबरोबर राहणार, अदृश्य शक्ती’ने मदत केल्याचा दावा!

सोलापूर : संपूर्ण राज्यात शेकापने एकमेव जागा जिंकलेल्या सांगोल्यात या पक्षाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपले आजोबा दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा चालवत महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याचे ठरविले आहे.

आपल्या विजयामागे ‘अदृश्य शक्ती’ चा हात असल्याचा त्यांनी केलेल्या दावा दुसऱ्या बाजूला चर्चेचा विषय ठरला आहे. सांगोला मतदार संघात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मावळते आमदार शहाजीबापू पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दीपक साळुंखे या दोघांचा पराभव करून विजय मिळविला आहे. यात शिवसेनेतील मत विभागणीचा लाभ शेकापने घेतल्याचे दिसून येते.विधानसभेचे मतदान होईपर्यंत राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरस होईल आणि महायुतीला काठावर बहुमत मिळेल, असा राजकीय जाणकारांचा होरा होता.

या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपण निवडून आल्यास सांगोल्याच्या विकासासाठी महायुतीला समर्थन देण्याची मानसिकता बोलून दाखविली होती. त्याचवेळी महायुतीच्या मुंबईतील ज्येष्ठ नेते डॉ. देशमुख यांच्या संपर्कात होते. दरम्यान, महायुतीला २३६ एवढे भरघोस बहुमत मिळाले. त्यामुळे मित्रपक्ष सोडून अन्य छोट्या पक्षांचा वा अपक्षांचा आधार घेण्याची गरज महायुतीला राहिली नाही.परिणामी, छोट्या पक्षांसह अपक्ष आमदारांचे महत्त्व कमी झाले. या पार्श्वभूमीवर सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी महायुतीच्या समर्थनाचा विचार सोडून देऊन महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचा मनोदय बोलून दाखविला आहे.

आपले आजोबा गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याची आणि जातीयवादी शक्तींपासून दूर राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीने शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना डावलून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सांगोल्याची जागा लढविण्यासाठी दिली होती. त्यामुळे आपणांस महाविकास आघाडीची साथ मिळाली नाही. आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभाही मिळाल्या नाहीत. मात्र तरीही दिवंगत नेते गणपतराव देशमुख आणि शेकाप बरोबर मागील तीन-चार पिढ्यांपासून प्रेम करणाऱ्या मतदारांनी आपणास साथ दिली.

गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आपण सोडणार नाही, असे नवनिर्वाचित आमदार डॉ. देशमुख यांनी सांगितले.या निवडणुकीत एकीकडे गावागावातून मतदारांची साथ मिळत असताना दुसरीकडे काही ‘अदृश्य शक्तीं’नीही मदत केली, याचाही उल्लेख डॉ. देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे ही अदृश्य शक्ती नेमकी कोण, याबाबत कुतूहल निर्माण झाले असून त्याची चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button