100 अधिकार्यांसह 700 पोलिस तैनात
विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता पोलिस प्रशासन शनिवारी होणार्या मतमोजणीसाठी सज्ज झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 5 ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने त्या ठिकाणी 100 पोलिस अधिकारी 700 पोलिस कर्मचारी तसेच 4 सीएपीएफ आणि 2 एसआरपीएफ अशा 6 कंपन्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या असल्याची माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी काही ठिकाणी मार्ग वळवण्याबाबतचे प्रस्ताव पोलिस विभागाने जिल्हाधिकार्यांकडे पाठवले होते. त्या प्रस्तावांना जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिली आहे. तसेच काही ठिकाणी बंदोबस्तासाठीचे नियोजन करताना वाहनांच्या पार्किंगचेही नियोजन करावे लागणार आहे. त्याबाबतच्या सविस्तर सूचना संबंधित ठिकाणचे अधिकारी करणार आहेत.
या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू असणार आहे.लाऊड स्पिकरचा वापर करताना तसेच कुठल्याही प्रकारचा जमाव जमवताना त्या ठिकाणी प्रांताधिकार्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. लाऊड स्पिकरची परवानगी पोलिस ठाण्यांकडून देण्यात येणार आहे. मतमोजणी संबंधीची सर्व खबरदारी जिल्हा पोलिस विभागाकडून घेण्यात आलेली आहे. या कालखंडात नागरिकांनीही पोलिस विभागाला सहकार्य करून त्यांच्या नियम आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.