
जामदा प्रकल्पाचे काम रेटताना शासनाने स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करू नये : आमदार सदाभाऊ खोत
राजापूर : आधी पुनर्वसन करा, मग धरण बांधा यासह जामदा प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत. कोणताही प्रकल्प असो, तो राबविताना स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही खबरदारी घेतली पाहिजे. मात्र जामदा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून शासन-प्रशासन आणि ठेकेदार जामदा प्रकल्पाचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे मुळीच खपवून घेणार, स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रसंगी राज्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून हा लढा अधिक तीव्र करू असा इशारा रयत क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
आ. खोत यांच्या या तालुका दौऱ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका अध्यक्ष अभिजित गुरव आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
शनिवारी ‘जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत राजापूर तालुका दौऱ्यावर आलेल्या आ. खोत यांनी तालुक्यातील जामदा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी जामदा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. तर प्रकल्पग्रस्तांचे योग्य पध्दतीने पुनर्वसन न करता धरणाचे काम रेटून नेण्यात येत असल्याचा आरोप केला. यावेळी आ. खोत यांनी प्रकल्प रद्द करणे जरी शक्य नसले तरी प्रकल्पग्रस्तांना न्याय मात्र मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. या स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न आपण शासनाकडे मांडू. मात्र योग्य न्याय मिळाला नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जामदा प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभं करू आणि जनआंदोलन उभारू, असा इशारा खोत यांनी दिला आहे.
या दौऱ्यात आ. खोत यांनी ताम्हाणे धरणालाही भेट दिली व या भागातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. तर पांगारे बुद्रुक धरणग्रस्तांच्याही समस्या जाणून घेत नळपाणीपुरवठा योजनेबाबतही अधिकाऱ्यांशी राजापूरात चर्चा केली. यावेळी त्यांनी या परिसरातील १४ गावांसाठी मंजूर असलेली २५ कोटींची नळपाणीपुरवठा योजना लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.