सिने अभिनेता जितेंद्र आणि कुटुंबियांनी तब्बल ८५५ कोटींना विकली अंधेरीतील जमीन


मुंबई : वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. मात्र सध्या एका जमिनीच्या व्यवहारामुळे ते चर्चेत आले आहेत. जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील अंधेरी येथील स्वतःची एक जमीन तब्बल ८५५ कोटींना एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स ॲण्ड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला विकली असून उभयतांमध्ये २९ मे २०२५ रोजी जमीन विक्रीबाबत करार झाला.

जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांनी अंधेरीतील जमिनीचा व्यवहार ८५५ कोटींना केला असून या व्यवहारासाठी ८.६९ कोटींचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. हा करार २९ मे २०२५ रोजी नोंदणीकृत झाला आणि यामध्ये ९,६६४.६८ चौरस मीटर (सुमारे २.३९ एकर) क्षेत्रफळाच्या दोन लगतच्या भूखंडाची विक्री करण्यात आली आहे. या जागेवर सध्या बालाजी आयटी पार्क असून त्यात एकूण तीन इमारती आहेत, त्यांचे एकूण बांधकाम क्षेत्र अंदाजे ४.९ लाख चौरस फूट आहे. अभिनेते जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या पॅन्थियन बिल्डकॉन व तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स यांच्यामार्फत या जमीन विक्रीचा व्यवहार झाला आहे. स्क्वेअर यार्ड्सने पुनरावलोकन केलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार ही माहिती समोर आली आहे. भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी ही मालमत्ता एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स ॲण्ड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ रोजी पंजाबमध्ये झाला. ते लहान असतानाच कुटुंबाबरोबर मुंबईत आले. जितेंद्र सुरुवातीला मुंबईतील गिरगाव परिसरात रहात होते. त्यांनी १९५९ च्या ‘नवरंग’ चित्रपटात दुहेरी भूमिका करीत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर विविध चित्रपटातून निरनिराळ्या भूमिका साकारत भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले. सध्या जितेंद्र हे ८३ वर्षांचे असून वयोमानामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. मात्र आता अंधेरी येथील स्वतःची एक जमीन तब्बल ८५५ कोटींना विकल्यामुळे जितेंद्र आणि कुटुंबिय चर्चेत आले आहेत.

एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स कंपनीचे नेमके काम काय ?

एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स ॲण्ड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी यापूर्वी ‘नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस’ म्हणून ओळखली जायची. ही कंपनी क्लाउड सोल्यूशन्स, होस्टिंग, डेटा व्यवस्थापन, सायबर सुरक्षा आणि ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट यासारख्या विविध तंत्रज्ञान सेवा देण्याचे काम करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button