
शिंदे गटाला भाजपच सुरूंग लावणार : आ. भास्कर जाधव यांची टीका
रत्नागिरी : राज्यातील सत्ता विश्वासघाताने बळकावण्यात आली असून ती वैधानिक मार्गाने नाही. मागील अडीच वर्षे सत्ता न मिळाल्याचा सूड शिंदेंना बरोबर घेऊन भाजप उगवत आहेत. विकासासाठी सत्तेचा उपयोग न करता फक्त सुडासाठीच होत आहे. हा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, शिंदे गटाला भाजपच सुरुंग लावेल, असे मत शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरीत व्यक्त केले.
रत्नागिरीतील शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीसाठी आलेले आ. जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मागील निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत राहून विरोधात काम केले आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत ते विश्वासघात करू शकणार, हे शिंदे गटाला माहिती आहे. त्यासाठीची अन्य पक्षातील आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहे. चाळीस आमदार, बारा खासदार सोडून शिवसेना नेस्तनाबूत होईल, असे भाजपला वाटले होते. गेल्या काही महिन्यात ठाकरे यांच्याकडील जनाधार वाढत आहे, असे आ. जाधव यांनी सांगितले.