
यशवंत गडाची नव्याने बांधलेली तटबंदी पहिल्याच पावसात कोसळली, निकृष्ट कामाबाबत शिवप्रेमींमध्ये संताप
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथील ऐतिहासिक घेरा यशवंतगडाची नव्याने बांधण्यात आलेली तटबंदी प्रहिल्याच पावसात कोसळल्याचे वृत्त पसरताच संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. अशाप्रकारे निकृष्ट काम करणार्या ठेकेदारासह पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी समस्त शिवप्रेमी नागरिकांतून करण्यात येत आहे.
साखरी नाटे ग्रामपंचायत हद्दीतील घेरा यशवंतगडच्या डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाला ८ कोटी १९ लाख रुपयाचा निधी मंजूर असून लातूर येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम सुरू आहे दीड वर्षापासून किल्ला डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व पावसात किल्ल्याच्या दर्शनी भागातील नव्याने बांधलेली तटबंदी कोसळली आहे. या बाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच संपूर्ण राजापूर तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.




