रत्नागिरी मतदारसंघाचा निकाल लागणार २६ फेऱ्यांमध्ये

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर आता मतदारांना २३ तारखेच्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. रत्नागिरी विधानसभेच्या मतमोजणीसाठी एकूण २० टेबल लागणार असून त्यातील १४ टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी २६ फेऱ्यामंध्ये होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतदानाची मोजणी होणार असून दुपारी २ वाजेपर्यंत या मतदारसंघाचा निकाल स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून मतमोजणीची तयारी जोरात सुरु आहे. मतमोजणीसाठी येणाऱ्या कर्मचारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठीही वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवार व कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाटबंधारे कार्यालयानजीक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये ही मतमोजणी शनिवारी होणार आहे. एकूण २० टेबल लागणार असून, त्यातल १४ टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी होणार आहे. ५ टेबलवर पोस्टल मतांची मोजणी होणार असून एका टेबलवर ईटीपीबीएस मतांची मोजणी होणार आहे.

पोस्टल मतदानाची मोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर ईव्हीएम मशिनवरील मतमोजणी सकाळी ८.३० सुरु होणार आहे. २६ फेऱ्यांमध्ये ही मोजणी होणार असल्याने दुपारी २ वाजेपर्यंत रत्नागिरी विधानसभेचा निकाल स्पष्ट होणार आहे. निकालाच्या दिवशी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी व पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो , हे लक्षात घेऊन पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पोलिसांनी कुवारबाव आरटीओ नाका ते रेल्वे ब्रीजपर्यंतची वाहतूक सकाळी ६ ते सायं. ४ वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वाहतूक व्यवस्था पर्यायी मार्गावरून कुवारबाव आरटीओ नाका, कंचन हॉटेल, श्रध्दा हॉटेल, रॉयल एनफिल्ड शोरुम मार्गे वळवण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button