
मौजे दहागाव येथील मंगेश महादेव पवार (वय 38) या तरुणाच्या मृत्यूची चौकशी व्हावी:
मौजे दहागाव येथील मंगेश महादेव पवार (वय 38) या युवकाचा मृतदेह 20 नोव्हेंबर 2024 रोजी त्याच्या राहत्या घरी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी चौकशीसाठी ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिले आहे.या संदर्भात घटनास्थळावरुन प्राप्त माहितीनुसार 20 रोजी मंगेशने त्याच्या पत्नीस दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुंबळे येथे सोडले व मी बाहेर जातोय, असे सांगून निघून गेला. सायंकाळी त्यांचा फोन बंद असल्याने त्याचा शोध घेत असता पत्नी व भावास तो आढळून आला नाही. त्याचा शोध सुरु असताना भाऊ व पत्नी घरी आले असता घर बाहेरून कुलूपबंद आढळले. कुलूप उघडून ते दोघे आत आले असताना स्वयंपाक घरात डोक्याला इजा असलेल्या स्थितीत तो आढळून आला. यावेळी घराचा मागील दरवाजा उघडा होता.
मृताची स्थिती लक्षात घेऊन पत्नी व भावाने त्याला गाडीतून डॉक्टरकडे आणले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेची मंडणगड पोलिस स्थानकात माहिती देण्यात आलेली असल्याने मृत युवकांचे पार्थिव मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनाकरिता आणले. मंडणगडचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तातडीने तपास सुरु झाला.युवकाचा मृत्यू हा नैसर्गिक नसल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर तपासाअंती गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.