पुण्यात आयटी अभियंत्याला 6 कोटीचा गंडा, त्याच्या बरोबर नक्की काय झालं?
आयटी अभियंत्याला तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याची बतावनी करत तब्बल 6 कोटी 29 लाख रुपयांना लुटण्यात आलं आहे. पुण्यात ही घटना घडली आहे. या अभियंत्याला डिजिटल अरेस्ट दाखवत त्याची लुट करण्यात आली आहे. पुण्यातील पाषाण भागात ही घटना घडली. या प्रकरणी आता पुण्याच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसापासून सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. यात सायबर भामटे उच्च शिक्षित लोकांना लक्ष्य करत आहेत. त्यातून त्यांची सर्रास लुट होत आहे. शिवाय भितीपोटी काही जण या भामट्यां पुढे शरणागती पत्करतात. त्यातून त्यांची कोट्यवधींची लूट होत आहे. अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यात समोर आल्या आहेत. मात्र आपली फसवणूक झाल्यानंतर हे पिडीत पोलिसांकडे मदतीसाठी धावत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील पाषाण या भागात झाली आहे.
सायबर भामट्यांनी एका अभियंत्याला फोन केला. तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. या फोननंतर तो अभियंताही घाबरून गेला. भामट्यांनी त्याला अटक टाळायची असल्यास पैशाची मागणी केली. असे करत त्यांनी त्याच्या अकाऊंटमध्ये तब्बल 6 कोटी 29 लाख रूपये लांबवले. विशेष म्हणजे यावेळी या अभियंत्याला डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते.
त्यानंतर या भामट्यांनी पुन्हा 60 लाखाची मागणी केली. त्यावेळी काही तरी गडबड असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिला. शिवाय थेट पुणे पोलिसांची सायबर गुन्हे शाखा गाठली. झालेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. हा प्रकार ऐकून पोलिसही चक्रावून गेले. आता हे नक्की कोणी घडवून आणले आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. सहा कोटीचा चुना लागल्याने अभियंताही शॉकमध्ये आहे.