
तुमच्या खिशातली ५०० ची नोट नकली तर नाही? RBI चा थेट इशारा!
तुमच्या खिशात असलेली ₹५०० ची नोट बनावट तर नाही ना? देशभरात अत्यंत हुबेहुब बनावट ५०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून गृह मंत्रालयाने यावर हाय अलर्ट जाहीर केला आहे.या नकली नोटांमध्ये एक गंभीर पण सूक्ष्म चूक आहे – ‘RESERVE’ या शब्दाऐवजी ‘RASERVE’ छापले गेले आहे.
या बनावट नोटा इतक्या अचूक बनवण्यात आल्या आहेत की, सामान्य माणसाला खऱ्या आणि खोट्या नोटेमधील फरक ओळखणं अवघड जात आहे. त्यामुळे बँकांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, या नकली नोटांमध्ये ‘RESERVE BANK OF INDIA’ या ठिकाणी ‘RESERVE’ ऐवजी ‘RASERVE’ असा स्पेलिंगमधील बदल आहे. ही चूक इतकी सूक्ष्म आहे की ती सहजपणे लक्षात येत नाही. त्यामुळे या नोटा फसवणुकीसाठी अत्यंत प्रभावी आणि धोकादायक मानल्या जात आहेत.
या प्रकरणामुळे DRI, FIU, CBI, NIA, SEBI आणि बँकांना सतर्कतेचे आदेश दिले गेले आहेत. सर्व बँकांना अशा नोटा ओळखण्यासाठी चित्रांसह मार्गदर्शक सूचना पाठवण्यात आल्या असून, संशयास्पद नोटा आढळल्यास तपास यंत्रणांना तत्काळ कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, या नकली नोटांची मोठी खेप देशभरात आधीच प्रसारित झाली असून, अनेक ठिकाणी त्या सर्वसामान्य चलनात मिसळल्या गेल्या आहेत. गृह मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्ट इशारा दिला आहे की, या नोटांची नेमकी संख्या किती आहे, हे सांगता येत नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे अत्यावश्यक आहे.
बनावट नोटांचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने NIA, FICN को-ऑर्डिनेशन ग्रुप (FCORD) आणि TFFC सेल यासारख्या यंत्रणांना कामाला लावले आहे. याशिवाय, सर्व बँक शाखांमध्ये आणि नोटा स्वीकारणाऱ्या ठिकाणी नोटा तपासणाऱ्या विशेष मशिन्स बसवण्यात आल्या आहेत.