
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अस्वच्छता
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाण्याने तुंबलेली गटारे आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याकडे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन लक्ष केव्हा देणार असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांसह जिल्ह्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालय विभागाच्या तळ मजल्याला ओपीडी असून पहिल्या मजल्यावर प्रसूती वार्ड आहे. या प्रसूती वार्डच्या शौचालयाचे पाइप तुटले असून त्यामधून घाणीचे पाणी सुरक्षा रक्षक कक्षाच्या भिंतीवरुन खाली येत असून ते इमारतीच्या बाजूला पसरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सुरक्षा रक्षकांसह आरोग्य कर्मचारी तसेच रुग्ण वॉर्ड व आपल्या कक्षामध्ये बसून जेवण घेत असतात. त्यांना या पसरलेल्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी सांडपाण्याचे पाईप तुटल्याने व गटारांची साफसफाई होत नसल्याने सांडपाण्याने गटारे तुंबली आहेत. अनेक दिवस साचलेल्या सांडपाण्यामध्ये जीव जंतू दिसत आहेत तर डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. याचा त्रास येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना होत आहे.
www.konkantoday.com