आज महामतपरीक्षा, ९.७० कोटी एकूण मतदार, एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे!

मुंबई : गेले महिनाभर कर्णकर्कश प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असले तरी मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे.*नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंगळवारी केले.

राज्यातील ९९० संवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला असून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ५०० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील एक लाख ४२७ मतदान केंद्रांपैकी ६७,५५७ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे एक लाखाहून अधिक समजाकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी ८६ हजार ४६२ अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना गृह मतदानांची सुविधा देण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबईत मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला होता. मतदान केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मतदानासाठी मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले होते. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यात लोकसभेच्या तुलनेत सुमारे दोन हजार मतदान केंदांची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर मतदारांना ताटकळत बसावे लागू नये म्हणून एका वेळी एकापेक्षा अधिक मतदारांना मतदान केंद्रात सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मतदान केंद्रात मोबाइल फोन नेता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचा शहरी भागांमध्ये काही प्रमाणात फटका बसू शकतो, अशी भीती निवडणूक आयोगाला आहे. मोबाइल न्यायचा नसेल तर मतदानाला का जावे, असा विचार करणारा एक वर्ग आहे.

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झारखंडमध्ये दुसऱ्या व अंतिम टप्प्यात बुधवारी ३८ मतदारसंघांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांत १३ नोव्हेंबरला मतदान झाले. उमेदवारांनी अखेरपर्यंत मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. राज्यात सत्तारूढ ‘इंडिया’ आघाडीविरोधात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात थेट सामना आहे. भाजपचे झारखंड प्रभारी व केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चित्रवाणी संदेशाद्वारे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही झारखंड मुक्ती मोर्चा व मित्रपक्षांना विजयी करण्याची विनंती केली. सरकारने केलेल्या कामांची यादीच या वेळी सादर केली.

*नांदेडमध्ये पोटनिवडणूक**नांदेड :* नांदेड जिल्ह्यात विधानसभेबरोबरच लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. जिल्ह्यात विधानसभेचे नऊ मतदारसंघ असून, त्यांपैकी नांदेड उत्तर व दक्षिण, भोकर, नायगाव, मुखेड, बिलोली या सहा मतदारसंघांमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान घेतले जाणार आहे. काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे ऑगस्ट महिन्यात निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पक्षाने त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यांचा सामना भाजपच्या संतुकराव हंबर्डे यांच्याशी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button