
निवडणूक व दिवाळी यामुळे शिबिरे नाहीत, शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा.
रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढीत सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. निवडणुका, दिवाळीमुळे रक्तदान शिबिरे घेतली जात नाहीत. त्याचा मोठा फटका शासकीय रक्तपेढीला बसला आहे. जिल्हा रूग्णालयात सर्व आजारांवरील शस्त्रक्रिया होत आहेत. त्यासाठी रोज सर्व रक्तगटाच्या किमान २५ रक्त बॅगांची आवश्यकता असते. मात्र रक्तदातांच्या कमतरतेमुळे रूग्णांच्या शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत.
रक्तगटासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदानांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.जिल्ह्यातील रक्तकेंद्रांमध्ये महिन्याभरापासून रक्ताची टंचाई आहे. त्यामुळे नातेवाईकांना रक्तगटाच्या बॅगेसाठी दारोदारी फिरावे लागत आहे. डेंगीबाधित, थॅलेसिमिया, प्रसूती, अपघातातील रूग्णांसाठी रक्त मिळवण्यास अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या टोकावरून जिल्हा रूग्णालयात रूग्ण येतात. दिवसाला सुमारे ५०० जणांची बाह्यरूग्ण तपासणी होते. अपघात विभाग, प्रसूती विभाग, साथीचे रूग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होतात. काही रूग्णांच्या शस्त्रक्रिया करायच्या आहेत, परंतु रक्ताचा तुटवडा असल्याने त्या खोळंबल्या आहेत. त्यात भूलतज्ञांचा विषयदेखील गंभीर आहे. एकच भूलतज्ञ असल्यानेही काही शस्त्रक्रिया रखडल्याचे समजते. www.konkantoday.com