
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर केली भूमिका स्पष्ट.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी थंडावणार आहेत, त्याआधी उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या बीकेसी मैदानामध्ये जाहीर सभा घेतली. उद्धव ठाकरे यांचं भाषण व्हायच्या आधी संजय राऊत यांनी भाषणातून वादग्रस्त वक्तव्य केलं, पण संजय राऊत यांच्या वक्तव्याचा फटका बसू शकतो, हे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरची भूमिका स्पष्ट केली.ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राची आहे. हे भाजपवाले आपल्याला नेहमी सांगत आले जर मोदी आणि शाह यांचा पराभव झाला तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील. 23 तारखेला गुजरातमध्ये फटाके फुटून द्यायचे नसतील तर महाविकास आघाडीला मत द्या’, असं संजय राऊत म्हणाले होते.संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून वाद होईल याची शक्यता लक्षात येताच उद्धव ठाकरेंनी लगेचच त्यांच्या भाषणातून या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं. ‘जे संजय राऊत बोलले, 23 तारखेला आपण जिंकणारच आहोत आणि राज्यभर फटाके फुटणार आहेत. पण महाझुठी जिंकली तर गुजरातमध्ये फटाके वाजतील.
मी सगळ्या गुजराती लोकांना दोषी धरत नाही, ना सगळ्या व्यापाऱ्यांना धरत. व्यापारीसुद्धा आपले आहेत’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी व्यापाऱ्यांबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं. ‘अमित शाह खोटं बोलत आहेत. व्यापारी नेहमी खोटं बोलतो, दुकानदार हा आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो अथवा भेसळ करतो. ग्राहकाला फसवतो’, असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. बीकेसीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी व्यापारीही आपले आहेत, असं म्हणत संजय राऊतांच्या वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला.