६३ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ च्या प्राथमिक फेरीला २६ नोव्हेंबर पासून प्रारंभ.
हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६३ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ च्या प्राथमिक फेरीला २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार असून मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी सात वाजता या स्पर्धा रंगणार आहेत.
रत्नागिरी केंद्रातून जिल्ह्यातील ९ संघ सहभागी झाले असून रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच असणार आहे.या स्पर्धेत २६ नोव्हेंबरला शिवाई सहकारी पतसंस्था मर्या. येळवण निर्मित नाटक – आजीचा बॉयफ्रेंड, २७ ला श्रीरंग, रत्नागिरी निर्मित नाटक – मॉर्फोसिस, २८ ला श्री लक्ष्मीपल्लीनाथ व इतर देवस्थान पाली निर्मित नाटक – अखेरचा सवाल, २९ ला संकल्प कलामंच निर्मितनाटक – रुक्ष, ३० ला संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच, देवरुख निर्मित नाटक-जब वी मेट, १ डिसेंबर ला प्रयोगिक थिएटर्स असोसिएशन रत्नागिरी निर्मित नाटक – महानायक, २ ला सहयोग रत्नागिरी निर्मित नाटक-चांदणी, ३ ला कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ कोतवडे, रत्नागिरी निर्मित नाटक-कडीपत्ता, ४ ला खल्वायन, रत्नागिरी निर्मित नाटक-स्वप्नपक्षी सादर होणार आहेत.
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनायाचे सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली हौशी राज्य नाट्य स्पर्धा होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे. रत्नागिरी केंद्रावर रत्नागिरी शहरासह जिल्हाभरातील एकूण नऊ संघांचा सहभाग असणार आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक श्री चवरे यांनी केले आहे.