मतदान प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या प्रत्येक आर्थिक हालचालींवर लक्ष ठेवा भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांचे सविस्तर सादरीकरण

रत्नागिरी, दि.17 : मतदानपूर्व 72 तासात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी या काळात वस्तू खरेदी, ऑनलाईन व्यवहार, अवैध मद्य वाहतूक व खरेदी यासह रोख रक्कम वाहतूक याबाबत होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे विशेष खर्च निरिक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सविस्तर सादरीकरण करत जिल्ह्यामध्ये केलेल्या एकूण कारवाईची माहिती दिली.

विशेष खर्च निरीक्षक श्री बालकृष्णन यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद मीना, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे आदी उपस्थित होते. खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

गोवा राज्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीबाबत यंत्रणेने लक्ष ठेवून, ती जिल्ह्यात दाखल होणारच नाही याची काळजी घ्यावी. तसेच कर्नाटक राज्यातूनही वाहतूक होण्याची शक्यता असल्याने आंतरराज्य सीमांवरील सर्व पथकांनी संशयित वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश विशेष खर्च निरिक्षक श्री. बालकृष्णन यांनी दिले.

निवडणूक काळात मोठ्या रकमांबरोबरच लहान लहान संख्येने जास्त व्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यास त्याबाबत तपासणी करा. कोणत्याही प्रकारे मतदारांवर परिणाम करणाऱ्या अर्थिक व्यवहार होणारच नाहीत यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश श्री.बालकृष्णन यांनी दिले. रोख रकामांची वाहतूक होत असलेल्या बँकेच्या वाहनामधील ओळख सुविधा जसे की क्यूआर कोड आदीबाबत चांगली प्रक्रिया राबवा. याचबरोबर सहकारी बँकांमधील सर्व व्यवहारांवर प्रत्येक तासाला लक्ष ठेवून संशयित प्रकरणांची माहिती इतर विभागांना पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

सी-व्हिजील, 1950 टोल फ्री क्रमांकावरील अर्थिक व वस्तू वाटपांच्या तक्रारी गांभीर्याने घ्या* शेवटच्या काही तासांमधील प्रचारात गैर मार्गाने मतदारांना पैसे किंवा वस्तू वाटपाची तक्रार सी-व्हिजील, 1950 टोल फ्री क्रमांकावर मिळाल्यास गतीने संबंधितावर कार्यवाही करावी. तसेच या दोन्ही तक्रारीसाठी असणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांनी सजग राहून मतदान प्रक्रिया पारदर्शक व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने करावे. सोशल मीडियावर जर कोणी अशा चुकिच्या प्रक्रियेचे व्हिडीओ शेअर केले तरी तो संदर्भ घेवून त्या ठिकाणी भरारी पथक पाठवा. पेड न्यूजबाबतही या काळात चांगल्या प्रकारे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, आज अखेर अवैध मद्यविरुध्द 131 गुन्हे नोंद करुन 1 कोटी 30 लाख 83 हजार 95 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक मतदार संघासाठी 3 असे एकूण 15 भरारी पथक नेमण्यात आले आहेत. स्थिर सर्वेक्षण पथक 21 नेमण्यात आले आहेत. 21 चेक नाक्यांवरुन येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.सी-व्हीजील, एनजीएसपी वर येणाऱ्या तक्रारींची निरगती करण्यात आली आहे. खर्च निरीक्षक श्री. कुमार, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती शेडगे यांनीही माहिती दिली.0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button