कोकणसाठी विकास प्राधिकरणाला बळ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जो नराधम आमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय, अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल, हे आमचे वचन आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारतळी येथे आयोजित केलेल्या राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.कोकण विकास प्राधिकरण निर्माण करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी बोलताना दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गुहागरमधील निरामय रुग्णालय सुरू करण्यासाठी लागणारे 10 कोटी रुपये आम्ही मंजूर करून देऊ. कोकण विकास प्राधिकरण निर्माण करतोय. त्यातून जलसिंचन, आंबा, काजू प्रकिया उद्योग, पर्यटन उद्योग, रस्ते विकास यासाठी या प्राधिकरणाला अडीच हजार कोटी आम्ही देणार आहोत. त्यातून कोकणचा बॅकलॉग भरुन निघेल. गुहागर विधानसभा मतदारसंघात कोकाकोला आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. मात्र सरकार बदलल्यावर मविआतील लोक सतत काय देणार म्हणून पाठीमागे लागले होते. त्यामुळे कोकाकोला प्रकल्प उभा करण्यास तयार नव्हती. आम्ही काहीही न मागता कोकाकोलाचा मार्ग सुकर केला. त्यांनी आता कोकणात 10 पट अधिक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सभेला पालकमंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र पाठक, माजी आमदार विनय नातू, सदानंद चव्हाण, बळीराज सेनेचे अशोक वालम, विश्वनाथ पाटील, शामराव पेजे, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश भांगर, कोकरे महाराज, सुरेश सावंत, नीलम गोंधळी, ठाणे येथील नगरसेवक राजेश मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.