1 लाख 83 हजार रुपये किमतींची गोवा दारु व 7 लाखाची कार असे मिळून 8 लाख 83 हजाराचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त
सावंतवाडीत गोवा दारूची चोरटी वाहतूक करणार्या अलिशान कारचा पोलिसांनी कोलगावपर्यंत पाठलाग करत कार कोलगाव मारुती मंदिर येथे अडवली. या कारमधून सुमारे 1 लाख 83 हजार रुपये किमतींची गोवा दारु व 7 लाखाची कार असे मिळून पोलिसांनी 8 लाख 83 हजाराचा मुद्देमाल जप्त केला .एका आलिशान कारमधून गोवा दारूची देवगडकडे वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती.
यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सापळी रचला होता. अशी संशयित कार सावंतवाडीतून पास होताच पोलिस प्रवीण वालावलकर व सहकार्यांनी कारचा पाठलाग करत कोलगाव मारुती मंदिर येथे कार अडवली. यावेळी कारची तपासणी केली असता कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची दारू मिळून एकूण 1 लाख 83 हजार रुपये किमतीची गोवा दारू आढळून आली.
याप्रकरणी विराज लक्ष्मीकांत वाडकर (21, रा. कोलगाव चर्च), अंतोन लॉरेन्स रॉड्रिक्स किनळे व वीरेंद्र वासुदेव जाधव (दोघेही रा.वाडा पडेल, ता. देवगड) या तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई शुक्रवारी पहाटे 3 वा. च्या सुमारास करण्यात आली.