१६३ अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ देऊन रडीचा डाव! खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका!!
बारामती : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १६३ जागांवरील अपक्ष उमेदवारांना निवडणुकीसाठी ‘पिपाणी’ चिन्ह देऊन भाजप रडीचा डाव खेळत आहे. निवडणूक आयोगाने चिन्हाच्या नावामध्ये अपेक्षित बदल न केल्यामुळे साताऱ्यामध्ये युतीचा उमेदवार विजयी झाला, याची कबुली स्वत: अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे भाजप रडीचा डाव खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुळे यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.
राज्यातील सत्तास्थापनेबाबत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची २०१९ मध्ये बैठक झाली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर त्यावरून त्यांनी घूमजाव केले होते. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही अदानी या बैठकीला उपस्थित होते, असे स्पष्ट केले होते. त्यासंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या की, या बैठकीला अदानी होते की नाही, याची कल्पना नाही. अजित पवार कधी हो म्हणतात तर कधी नाही म्हणातात. त्यामुळे हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारणे योग्य राहील. तेच त्याचे उत्तर देऊ शकतील, असे खासदार सुळे म्हणाल्या.
शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाइन होत नाही, याची कल्पना आहे. त्यामुळेच भाजप त्यांच्यावर टीका करत आहे. मात्र, पवार यांच्यावर टीका करून महागाईचा प्रश्न सुटणार नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे ते पवार यांच्यावर टीका करत आहेत. बारामतीमध्ये दादा कोण, हे बारामतीची जनता ठरवेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.