
कोकण मार्गावरील अतिजलद रेल्वेगाडीची धीम्या वेगाने धाव; तिकीट दरात अतिजलदचा अधिभार आकारून प्रवाशांची छुपी आर्थिक लूट!
मुंबई : कोकण रेल्वेवरून धावणारी रेल्वेगाडी अतिजलद (सुपरफास्ट) होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान ५५ किमी प्रतितास इतका असणे आवश्यक असते. त्यानंतर या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांवर अतिजलद अधिभार प्रवाशांकडून आकारला जातो. मात्र कोकण रेल्वेवरून धावणारी अतिजलद रेल्वेगाडी धीम्या वेगाने धावत असून देखील प्रवाशांकडून तिकीट दरात अतिजलदचा अधिभार आकारून प्रवाशांची छुपी आर्थिक लूट केली जात आहे.
*रेल्वे मंडळाने २००६ मधील १०५ व्या निर्णय व रेल्वे मंत्रालयाने वारंवार दिलेल्या सुचनांनुसार दोन्ही दिशांंना किमान ताशी ५५ किमी किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना ‘अतिजलद’चा दर्जा दिला जातो. या रेल्वेगाडीतून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशांमागे तिकिट दरात अधिकची रक्कम आकारली जाते. परंतु, वेगाच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या गाडी क्रमांक ०६०९७/०६०९८ इरोड-बाडमेर-इरोड साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडीला अधिभार आकारण्यात येत आहे.प्रत्यक्ष अंतर आणि नियोजित वेळेनुसार, ही ट्रेन ४५ तासांपेक्षा जास्त वेळात २,३५० किमी अंतर कापते. ज्यामुळे सरासरी वेग ५०.९ किमी प्रतितास (गाडी क्रमांक ०६०९७) आणि ५१.८ किमी प्रतितास (गाडी क्रमांक ०६०९८) असा होतो. ज्यामुळे ती अतिजलद निकषात अपात्र ठरते.
गाडी क्रमांक ०६०९७ इरोड जंक्शन – बारमेर साप्ताहिक विशेष इरोड जंक्शन बारमेर २, ३५० किमी अंतर ४६ तास १० मिनिटांत पार करते. त्यामुळे या रेल्वेगाडीचा ताशी वेग ५१ किमी असतो. तर, गाडी क्रमांक ०६०९८ बार्मर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष बार्मर इरोड जंक्शन २, ३५० किमी अंतर ४५ तास २५ मिनिटांत पार करते. त्यामुळे या रेल्वेगाडीचा ताशी वेग ५२ किमी असतो. त्यामुळे दोन्ही दिशांना सरासरी वेग ५५ किमी प्रतितास पेक्षा खूपच कमी आहे.
*एक्झिक्युटिव्ह वातानुकूलित, विस्टाडोम डबा आणि प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यांसाठी ७५ रुपये अतिजलद अधिभार आकारला जातो. वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित चेअर कार डब्यासाठी ४५ रुपये, द्वितीय श्रेणी डब्यासाठी १५ रुपये असा अतिजलद शुल्क आकारण्यात येतो.गाडी क्रमांक ०६०९७/०६०९८ इरोड- बाडमेर-इरोड साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडीसाठी अतिजलद शुल्क आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. रेल्वेमंडळाने दिलेल्या अतिजलदबाबत दिलेल्या निकषांनुसार ही रेल्वे धावत नाही. अतिजलद निकषांची पूर्तता करत नसल्याने प्रवाशांकडून आकरण्यात येणारा अतिरिक्त अधिभार घेणे बंद करणे आवश्यक आहे, असे कोकण रेल्वे समितीचे अक्षय महापदी यांनी सांगितले.