
आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा राजापुर पोलीस ठाण्यात दाखल
निवडणूक आयोगाने परवानगी नाकारलेली असतानाही वचननामा पत्रके वाटल्याप्रकरणी राजापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमृत तांबडे यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 127 (ए ) भारतीय न्याय संहिता कलम 226 अन्वये राजापूर पोलिसांत आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजापूर शहरातील अमृत अनंत तांबडे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या अनुषंगाने अमृत तांबडे यांनी आपला जाहीरनामा तयार केला असून, तो प्रसिद्ध करण्याची परवानगी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे मागितली होती; मात्र सदर जाहीरनाम्यातील काही मुद्दे गैरलागू असल्याने निवडणूक अधिकार्यांनी तो प्रसिध्द करण्यास, मतदारांमध्ये वाटण्यास परवानगी नाकारली होती. तरीही अमृत तांबडे यांनी या जाहीरनाम्याचे प्रसिध्दी पत्रक मतदारांमध्ये वाटले व त्याची जाहिरातही केली .या प्रकरणी निवडणूक नोडल अधिकारी जितेंद्र जाधव यांनी अमृत तांबडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याने तांबडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.