
सावर्डे येथील चौपदरीकरण कामाबाबत आमदार शेखर निकम यांनी घेतली केंद्रीय मंत्री गडकरींची भेट
सावर्डे : बाजारपेठेतील आरई वॉल व्हीयूपी पूल रद्द करून येथे सिंगल पिलर पुलाचे बांधकाम आणि इतर महार्गाच्या समस्या याबाबत आ. शेखर निकम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा केली. चौपदरीकरणाचे काम संथगतीने चालू असल्याने तसेच झालेले काम हे दर्जाहीन असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व अन्य समस्या देखील भेडसावत आहेत. हा मार्ग जलदगतीने पूर्ण व्हावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेकडून सातत्याने होत आहे.
परशुराम ते आरवली या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सावर्डे गाव हे 54 गावांचे केंद्र आहे आणि या गावांची मुख्य बाजारपेठ आहे. सुमारे 14 हजार लोकसंख्या असलेले सावर्डे गाव आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे.
येथे शैक्षणिक व वैद्यकीय संस्था आहेत. सावर्डे येथे महाराष्ट्राच्या विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सावर्डे मार्केटमधील चौकोनी चौकाखाली सलग दोन अंडरपास (व्हीयूपीएस) मंजूर करण्यात आले आहेत. आरई भिंतींमुळे व्यापारी आणि लगतच्या गावातील स्थानिक ग्रामस्थ यांची गैरसोय होणार आहे. सावर्डे गावातील ग्रामस्थांनी आरई वॉल पुलाऐवजी बाजारपेठेत एकाच खांबावर उड्डाण पूल बांधावा. यामध्ये सिंगल पिलर पुलाच्या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाची मागणी आहे. मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आरई वॉल व्हीयूपी पूल रद्द करून तो सिंगल पिलर पूल व्हावा, अशी नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांची तीव्र इच्छा आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन नागरिकांनी सिंगल पिलर ब्रिजची मागणी करूनही आरई वॉल व्हीयूपी पूल रद्द करून सिंगल पिलर ब्रिज करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. सावर्डेमध्ये ओव्हरब्रीज मंजूर व्हावा, अशी मागणी असून याबाबत चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी ना. गडकरी यांच्याकडे ही मागणी केली आहे.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव हे उपस्थित होते.