उद्योगपतींच्या सांगण्यावरुन उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.उद्योगपतींच्या सांगण्यावरुन उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरूनही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे.वरळीत मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी दुसरी सभा घेतली आहे. वरळीत संदीप देशपांडे यांची लढत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याशी लढत होणार आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. वरळीतल्या जांभोरी मैदानातल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
“कोकणामध्ये येणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता. मग त्या अणुऊर्जा प्रकल्पाचे काम थंड पडले. आपल्या कोकणामध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प आला आणि तिथे भूकंप होऊन स्तुनामी आली आणि त्या अणुऊर्जा प्रकल्पात पाणी शिरलं तर हाहाकार होईल असं कारण त्यांनी दिलं होतं. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कल्पना नाही का मुंबईत १९६० साली बाबा ऑटोमिक सेंटर उभे करण्यात आले आहे. त्यामध्ये न्यूक्लिअर रिऍक्टर आहेत, आपल्या शहराच्या मध्यभागी अणुऊर्जा प्रकल्प आहे तर कोकणातला अणुऊर्जा प्रकल्प रद्द का करायला लावला,” असा सवाल राज ठाकरेंनी केला.
“कोणत्या उद्योगपतीने या अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध करायला सांगितला होता. विरोध करतात तेव्हा कोणीतरी उद्योगपती यामागे असतोच त्याशिवाय विरोध करत नाही. नाणारला सुद्धा ऑइल रिफायनरी येणार होती. आता विचार करा की या ऑइल रिफायनरीला उद्धव ठाकरेंनी विरोध कशासाठी केला. त्यांच्या परिचयाचे अशी कोण लोक आहेत ज्यांची ऑइल रिफायनरी आहे ज्यांच्या ते लग्नाला जातात. अजून एक ऑइल रिफायनरी आली तर आपला मित्र तोट्यात जाईल आणि तो तोट्यात जाऊ नये म्हणून कोकणात येणाऱ्या ऑइल रिफायनरीला विरोध झाला. हे असे विरोध सहज होत नसतात. यामागे खूप मोठे राजकारण असतं. नुसते साधे राजकारण नसते तर त्याच्यामागे सगळे आर्थिक राजकारण असतं,” असेही राज ठाकरे म्हणाले.