आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांना त्यांच्याच गडात दिले आव्हान.
दापोलीच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. संघर्ष आणि लढाई शिवसेनेच्या नशिबात आहेत. ती लढाई आपण लढत असल्याचं ते म्हणाले. ज्या लोकांना आपले समजले. आपल्या परिवारातले समजले. काहींना काका समजलो. त्यांच्या मुलांना मित्र समजत होते. पण त्यांना खोके दिसले. त्यालाच त्यांनी एका रात्रीत ओके केले. रातोरात आपले होते ते परके झाले. इथं ही एक गद्दार आहे असं म्हणत त्यांनी कदम पिता पुत्रावर हल्ला चढवला. नाटक करणारा गद्दार, टीव्हीवर रडणारा गद्दार, आवाज चढवून बोलणारा गद्दार, शिविगाळ करणारा गद्दार, धमकावणारा गद्दार असा उल्लेख आदित्य यांनी केला.आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांच्या गडात त्यांना आव्हान दिले.
दापोली इथे झालेल्या सभेत त्यांनी रामदास कदम यांना बरचं काही सुनावलं. शिवाय मतदार संघात जर कोणी गुंडगिरी करत असेल तर सरकार आल्यानंतर त्यांचा बंदोबस्त करू असेही आदित्य यावेळी म्हणाले. दापोली मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय कदम रिंगणात आहेत. त्यांच्या समोर रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात आहेत.